महाराष्ट्र
लोकमन न्यूज..अनिल चौधरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवाहन, दिवस-रात्र एक करून, स्वप्नांच्या मागे धावणारे तुम्ही... तुमचे डोळे थकले असतील, पण मनातली जिद्द अजूनही जागी आहे. 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी... या केवळ तारखा नाहीत, तर तुमच्या गेल्या काही वर्षाच्या तपस्येचा निकाल लागण्याचे दिवस आहेत.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यापूर्वी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षाही होणार आहेत.
मित्रांनो, परीक्षेला जाताना एकदा मागे वळून आपल्या आई-वडिलांच्या हातांकडे आणि त्यांच्या डोळ्यांकडे नक्की बघा. त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यांच्या डोळ्यांतले स्वप्न फक्त तुमच्यासाठी आहे. त्यांना तुमच्याकडून फक्त 'रिझल्ट' नकोय, तर त्यांना तुमचा 'अभिमान' वाटेल असं तुमचं वागणं हवंय.
परीक्षेचा काळ म्हटला की थोडं दडपण येतंच. पण हे दडपण दूर करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रामाणिकता. अनेकांना वाटतं, एखादी छोटीशी 'कॉपी किंवा 'गैरप्रकार' आपल्याला यश मिळवून देईल. पण लक्षात ठेवा, चोरी करून मिळालेली टक्केवारी आयुष्याच्या परीक्षेत कधीच कामी येत नाही. कष्टाने मिळालेले 50 टक्के हे फसवणूक करून मिळवलेल्या 90 टक्क्यांपेक्षा कितीतरी पटीने महान असतात.
परीक्षेच्या काळात स्वतःची काळजी घ्या, आरोग्य जपा, पुरेशी झोप आणि सकस आहार घ्या. आत्मविश्वास ठेवाः तुम्ही जे वाचलंय, त्यावर विश्वास ठेवा. वेळेचे भान ठेवा, परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा आणि शांत चित्ताने पेपर लिहा. गैरप्रकारांपासून लांब राहा, तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू शकतं.
ही परीक्षा तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तर एक सुंदर सुरुवात आहे. अपयशाच्या भीतीने किंवा यशाच्या हव्यासापोटी चुकीचा मार्ग निवडू नका. लढून मिळालेल्या यशाची चव काही वेगळीच असते. तुमच्यावर, तुमच्या कष्टावर आणि तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा.
चला तर मग... कंबर कसा, मनाशी खूणगाठ बांधा आणि सिद्ध करा की, तुम्ही कष्टाने आणि जिद्दीनेच विजय मिळवणार! दहावी आणि बारावीच्या सर्व वीरांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छाः विजयाचा टिळा लावूनच परत या! 

परीक्षा म्हणजे शेवट नव्हे, आयुष्याची सुरुवात – जिल्हाधिकारी नाशिक
Anil Chaudhari ५/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
