उन्हाच्या वाढत्या तीव्रतेपासून चिमुकल्यांचे संरक्षण! अमळनेर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची वेळ आता सकाळच्या सत्रात, मा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींचा आदेश.
(प्रतिनिधी लोकमन न्यूज निंब अमळनेर) मुंबई: वाढत्या उन्हाची तीव्रता आणि बालकांच्या आरोग्यावर होणारा त्याचा विपरीत परिणाम लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची वेळ बदलून सकाळच्या सत्रात करण्यात आली आहे. हा महत्त्वाचा निर्णय अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मोठे यश असून, मा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी या बदलाचे अधिकृत आदेश पारीत केले आहेत.
मा. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार, दि. १ एप्रिल २०२६ ते दि. ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या केवळ सकाळच्या सत्रातच चालतील, जेणेकरून चिमुकल्यांना कडक उन्हाचा त्रास होणार नाही.
अंगणवाडीचे नवीन वेळापत्रक: चिमुकल्यांच्या सोयीसाठी बदल
📌 महत्त्वाचे मुद्दे:
- सकाळी ७.०० ते ७.१५: अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे.
- सकाळी ७.१५ ते ८.१५: पूर्व शालेय शिक्षण.
- सकाळी ८.१५ ते ८.३०: लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे.
- सकाळी ८.३० ते १०.१५: पूर्व शालेय शिक्षण.
- सकाळी १०.१५ ते १०.४५: लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार वाटप.
- सकाळी १०.४५ ते ११.३०: पोषण ट्रॅकर अॅपवर नोंदी घेणे तसेच दप्तर लिहिणे.
- सकाळी ११.३० ते १२.००: संदर्भ सेवा.
- दुपारी १२.०० ते ०१.३०: गृहभेटी, आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन आणि कुपोषित बालकांना आहार वाटप.
अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याबाबत युनियनने केलेल्या मागणीला यश आल्याने उन्हाच्या कडाक्यापासून चिमुकल्यांचा बचाव होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी युनियनचे व प्रशासनाचे आभार मानले असल्याची माहिती रामकृष्ण बी. पाटील यांनी दिली आहे.
(वृत्त संकलन : पंकज पाटील, अमळनेर)



