जगाच्या पोशिंद्याची मशागतीपासून ते बाजारात माल विकून रात्री उशिरा घरी परतेपर्यंत होणारी ससेहोलपट आणि त्याचा अफाट संयम; यावर प्रकाश टाकणारा 'लोकमन न्यूज'चा विशेष लेख.
निंब (लोकमन न्यूज विशेष): जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाच्या कर्जबाजारीपणाच्या आणि संयमाचा बांध फुटून त्याने केलेल्या आत्महत्यांच्या बातम्या आपण दररोज सभोवताली पाहतो आणि वाचतो. पण एक म्हण आहे ना, 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे!' शेतकऱ्याचा संयम खऱ्या अर्थाने अनुभवायचा असेल, तर प्रत्यक्ष शेतकरी व्हावे लागेल. अनेक संकटे पचवूनही आजचा बळीराजा 'कोण सुनेगा, किसको सुनाय, इसिलिये चूप रहते है!' हे गाणे गुणगुणत आपला संघर्ष मुकाट्याने सहन करत आहे.
संकटांची मालिका: मशागतीपासून पीक काढणीपर्यंत
शेतीची कामे सुरू करण्यापासूनच शेतकऱ्याच्या संयमाची खरी परीक्षा सुरू होते. शेतीची मशागत, मजुरांच्या विनवण्या आणि त्यांनी घेतलेला गैरफायदा इथूनच हा संघर्षमय प्रवास सुरू होतो. कर्ज काढण्याच्या वेळेस बँकेकडून येणारे विविध अडथळे, बियाणे खरेदी करताना होणारी आर्थिक लूट आणि त्यातही बोगस बियाण्यांची समस्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेलीच असते. या सगळ्यातून पीक उभे राहिले, तर निसर्गराजाच्या लहरीपणाचा फटका आणि पीक काढणीच्या वेळी पुन्हा मजुरांच्या विनवण्या व त्यांचा लहरीपणा सहन करावा लागतो.
📌 महत्त्वाचे मुद्दे:
- कर्ज मिळवण्यापासूनचे अडथळे.
- बोगस बियाण्यांमुळे होणारे नुकसान.
- मजुरांची समस्या आणि त्यांच्या लहरीपणाचा फटका.
- निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान.
बाजारसमितीतील मुजोरी आणि शेतकऱ्याची परवड
खरी समस्या सुरू होते ती शेतीमाल विकण्याच्या वेळेस. सकाळी चार वाजता माल गाडीत टाकून सहा वाजता बाजारसमितीच्या लाईनमध्ये दाखल व्हावे लागते. खाण्यापिण्याच्या अडचणी, हॉटेलचे जेवण आणि त्यात भर म्हणजे व्यापाऱ्यांची मुजोरी. धान्याची प्रत पाहण्याच्या नावाखाली हवेत कवडीमोल पद्धतीने पाच-सहा किलो धान्य जमिनीवर फेकले जाते, हे दृश्य शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे असते.
माल घेतल्यानंतर तो मोजण्याच्या आणि खाली करण्याच्या कसरती वेगळ्याच. अनेकदा गावाच्या बाहेर असलेल्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर रात्री सात वाजता माल खाली होतो. पुन्हा पैसे घेण्यासाठी आडत्यांच्या दुकानात चकरा माराव्या लागतात आणि रात्री नऊ वाजता 'कट्टी' लावून पैसे हातात पडतात. त्यानंतर घराकडे पोहोचायला रात्रीचे अकरा वाजतात.
तरीही संयमाचा मुग गिळून उभा...
इतकी ससेहोलपट आणि लूट होऊनही हा शेतकरी राजा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. संयमाचा मुग गिळून तो निमूटपणे पुन्हा कामाला लागतो आणि जणू काही, 'घुंगरू की तरह, बजता ही रहा हुं मैं, कभी इस पग मे कभी उस पग मैं!' हेच गाणे गुणगुणत राहतो. लोकमन न्यूजच्या वतीने, शेतकरी राजा, तुझ्या या अफाट सहनशक्तीस आणि संयमास खरोखरच सलाम!
(क्रमशः)
- अनिल चौधरी, लोकमन न्यूज, निंब



